Thursday 11 October 2012

आठवण - एक सोबती.......

आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्र-सोबती भेटतात काही शेवट पर्यंत सोबत असतात तर काही फुलपाखरांसारखे आठवणीचे रंग मागे ठेवून दूर निघून जातात......आठव मात्र कधीच दूर जात नाही ती सदैव सोबत करत असते...आपण दुःखात असो अथवा आनंदात आठवं आपली पाठ कधी सोडतच नाही......अनेकदा विचार करते एकट बसावं...एकांतात जिथे कुणी नसेल तशी जागा आणि वेळ दोन्ही जुळून येते....आजूबाजूला कुणी नसतं असते, असते ती  फक्त एकांतातील मी....त्यावेळी सहज काही आठवत आणि एखाद्या  मुंग्यांच्या वारुळातून कशा एका मागोमाग साऱ्या मुंग्या निघतात तशा सर्व आठवणींचा पसारा मनात पसरतो......त्यात काही चांगल्या तर काही कटू आठवणी असतात .....चांगल्या मनाला तजेला देऊन जातात तर कटू नेहमीसाठी काही शिकवण देऊन........मात्र माझ्या या  एकांताला सोबत असते ती यांचीच..... या आठवणींच्या विश्वात रमायला मला काही काळ वेळ लागतं असही नाही नाही.......एखाद्या निरागस बालकाला मनसोक्त बगळतांना  पाहिलं..... शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांना भांडताना बघितल....कॉलेजच्या कट्यावर चालेली  मस्ती बघतांना असो अथवा खिडकीत बसून बाहेर पडणारा पाऊस बघतांना...संध्यासमयी आकाशात विहार करणारे पक्षी बघतांना असो  किंवा सुर्याबुडीला आल्यावर पसरणाऱ्या अंधारात  आठवणी सतत माझ्या पिच्छा पुरावा असतात......
आठवणी या अशाच असतात चार चौघात नको असतांना डोळ्यात अश्रू आणतात तर एकट असतांना  चेहरयावर  हास्य देऊन जातात.....आठवणी या अशाच असतात रोज उगविणाऱ्या कोवळ्या किरणांसारख्या, स्वछंद फुलणाऱ्या फुलांसारख्या, आयुष्याच्या  शेवटपर्यंत खरी साथ देणाऱ्या मित्रांसारख्या.......या आठवणीच तर असतात.....!!!
जिंदगी आगे बढ जाती है
पिछे निशाणी छोडकर
बातें अक्सर रह जाती है
यादों की कहानी बनकर....

-  दिपीका………

Sunday 12 August 2012

माझ्यापरीने मी.....

चंद्रशेखर गोखले उर्फ चांगो  यांच्या ‘माझ्यापरीने मी’ या चारोळी संग्रहातील जीवनाचा वास्तविक दर्शन घडविणाऱ्या, विविध विषयांना हाताळत जीवनाची सत्यता सांगणाऱ्या काही सुंदर चारोळ्या...........

एक ओळख लागते आपल्याला
माणूस म्हणून जगण्यासाठी
इतकंच कशाला एकांतात
आरशात स्वतःला बघण्यासाठी.....

केवळ उडता येत म्हणून
फुलपाखरू उडत नाहीत
पण जरा निवांत बसली तर
माणसं त्यांना सोडत नाहीत.......

आपसूक डोळे भरून येतात
रडायचं नाही ठरविल्यावर
मन  काहीतरी शोधत राहतं
जसं आपण शोधतो काही हरवल्यावर......

आरशात पाहताना हल्ली मला
माझी बरीच रूप दिसतात
आश्चर्य म्हणजे त्यातील बरीच
मला अनोळखी असतात....

रडायचं नाही म्हणून
गुदमरत राहिलास
आणि जरासं थोपटलं तर
बांध फुटल्यागत वाहीलास .....

आभाळभर पाखरं
आणि मुठभर दाणे
आता कुणाला अधिक
तर कुणाला उणे.....

देहाला पोसण्यासाठी
मनाला किती सोसाव लागतं
आकांत करत एका जागी
निमुटपणे बसव लागतं....

ओंजळ भरून सांगितलं तर
ओंजळ भरून मिळतं
पण आपली ओंजळ भरली हे
कितीजणांना कळतं......

---चंद्रशेखर गोखले.....

Monday 23 July 2012

आयुष्य...


कवी उ. रा. मिरी यांच्या  “मी एकटा निघालो”  या कवितासंग्रहातील आयुष्याकडे डोळसपणे, सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकविणारी....शब्दात न मावणाऱ्या आयुष्याची अनंत रूपे कवेत घेत बरंच काही बोलणारी ही एक सुंदर कविता....
*** आयुष्य ***
आयुष्य एक यात्रा, आयुष्य एक मेळा
आयुष्य वेदनांचा, खग्रास ठोकताळा...
आयुष्य माणसांच्या, झपताल भावनांचा
आयुष्य वासनांचा, रंगीत पावसाळा...
आयुष्य उर्वशीची, कर्पूरगौर काया
घननीळ मैथुनाचा, आयुष्य कैफ काळा...
आयुष्य निग्रहाची, दुर्दम्य अग्निरेखा
आयुष्य आग्रहाची, अलमस्त धर्मशाळा...
आयुष्य अस्मितेचा, बेलाग एक किल्ला
दुनिये विरुद्ध जुलमी, आयुष्य एक हल्ला...
आयुष्य एक सीधे, आव्हान काळ पुरुषा
बिनतोड आसवांचा, आयुष्य हा रिसाला...
विरास विक्रमाची, आयुष्य एक संधी
आयुष्य शंकराचा, तिसरा अजेय डोळा...

   --- उ. रा. मिरी.

Thursday 12 July 2012

समोरच्याला योग्यरीत्या समजून घेऊन योग्य प्रतिसाद देणं ही एक कलाच मानली पाहिजे...... एखादं नातं फुलवण्यासाठी ते गरजेच ही आहे.......पण, ही कला सर्वाँनाच अवगत असते असं नाही.....कारण, कुणी कधी समोरच्या व्यक्तिच्या भावना जाणून घेण्यात कमी पडतो...तर कुणी आपल्या भावना योग्य पद्धतीने समोरच्यापर्यँत पोहचविण्यात कमी पडत असतो.....

दिपीका.......

Tuesday 3 July 2012

तहान......


कवी म.म. देशपांडे यांची सभोवतीचे अव्यक्त दुःख सूचकपणे आणि उत्कटतेने व्यक्त करणारी....मृत्यूनंतरही जनमाणसांच्या मनात ‘चिरंजीवी’ असण्याची आर्तता अन् उत्कटता प्रगट करणारी तहान ही कविता...
***तहान***
सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण...

व्हावे एवढे लहान
सारी माने काळो यावी;
असा लाभावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी...

सर्वकाही देता यावे
श्रेय राहू नये हाती;
यावी लाविता कपाळी
भक्तिभावनेने माती...

फक्त मोठी असो छाती
दुःख सारे मापायला ,
गळो लाज, गळो खंत
काही नको झाकायला...

राहो बनून आकाश
माझा शेवटचा श्वास;
मनामनात उरावा
फक्त प्रेमाचा सुवास...!!

---म. म. देशपांडे.

Tuesday 5 June 2012

जगत मी आलो असा…

सुरेश भट यांच्या “रंग माझा वेगळा” या काव्यसंग्रहातील ही एक अर्थपूर्ण...अप्रतिम अशी गझल...
जगत मी आलो असा
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की,  मग पुन्हा जुळलोच नाही...!
जन्मभर अश्रुस माझ्या शिकविले नाना बहाने,
सोंग पण फसव्या जिण्याचे, शेवटी शिकलोच नाही..!
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो,
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही..!!
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी ;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही..!!
स्मरतही नाही मजला चेहरे माझ्या व्यथांचे
एवठे स्मरते मला की, मला मी स्मरलोच नाही..!!
वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाईत
सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही..!!
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा
लोक मज दिसले अचानक, मी कुठे दिसलोच नाही...!!
----सुरेश भट....

Tuesday 29 May 2012

लाभले आम्हास भाग्य....


कवी सुरेश भट यांचे मराठीची थोरवी गाणारे, अवघ्या मराठी जनांना आपलेसे करणारे मराठी अभिमान गीत....
लाभले आम्हास भाग्य....

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी...

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी...

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी...

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी...

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी...

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी...

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी...

कवी - सुरेश भट...