Monday 23 July 2012

आयुष्य...


कवी उ. रा. मिरी यांच्या  “मी एकटा निघालो”  या कवितासंग्रहातील आयुष्याकडे डोळसपणे, सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकविणारी....शब्दात न मावणाऱ्या आयुष्याची अनंत रूपे कवेत घेत बरंच काही बोलणारी ही एक सुंदर कविता....
*** आयुष्य ***
आयुष्य एक यात्रा, आयुष्य एक मेळा
आयुष्य वेदनांचा, खग्रास ठोकताळा...
आयुष्य माणसांच्या, झपताल भावनांचा
आयुष्य वासनांचा, रंगीत पावसाळा...
आयुष्य उर्वशीची, कर्पूरगौर काया
घननीळ मैथुनाचा, आयुष्य कैफ काळा...
आयुष्य निग्रहाची, दुर्दम्य अग्निरेखा
आयुष्य आग्रहाची, अलमस्त धर्मशाळा...
आयुष्य अस्मितेचा, बेलाग एक किल्ला
दुनिये विरुद्ध जुलमी, आयुष्य एक हल्ला...
आयुष्य एक सीधे, आव्हान काळ पुरुषा
बिनतोड आसवांचा, आयुष्य हा रिसाला...
विरास विक्रमाची, आयुष्य एक संधी
आयुष्य शंकराचा, तिसरा अजेय डोळा...

   --- उ. रा. मिरी.

Thursday 12 July 2012

समोरच्याला योग्यरीत्या समजून घेऊन योग्य प्रतिसाद देणं ही एक कलाच मानली पाहिजे...... एखादं नातं फुलवण्यासाठी ते गरजेच ही आहे.......पण, ही कला सर्वाँनाच अवगत असते असं नाही.....कारण, कुणी कधी समोरच्या व्यक्तिच्या भावना जाणून घेण्यात कमी पडतो...तर कुणी आपल्या भावना योग्य पद्धतीने समोरच्यापर्यँत पोहचविण्यात कमी पडत असतो.....

दिपीका.......

Tuesday 3 July 2012

तहान......


कवी म.म. देशपांडे यांची सभोवतीचे अव्यक्त दुःख सूचकपणे आणि उत्कटतेने व्यक्त करणारी....मृत्यूनंतरही जनमाणसांच्या मनात ‘चिरंजीवी’ असण्याची आर्तता अन् उत्कटता प्रगट करणारी तहान ही कविता...
***तहान***
सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण...

व्हावे एवढे लहान
सारी माने काळो यावी;
असा लाभावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी...

सर्वकाही देता यावे
श्रेय राहू नये हाती;
यावी लाविता कपाळी
भक्तिभावनेने माती...

फक्त मोठी असो छाती
दुःख सारे मापायला ,
गळो लाज, गळो खंत
काही नको झाकायला...

राहो बनून आकाश
माझा शेवटचा श्वास;
मनामनात उरावा
फक्त प्रेमाचा सुवास...!!

---म. म. देशपांडे.