Tuesday 29 May 2012

लाभले आम्हास भाग्य....


कवी सुरेश भट यांचे मराठीची थोरवी गाणारे, अवघ्या मराठी जनांना आपलेसे करणारे मराठी अभिमान गीत....
लाभले आम्हास भाग्य....

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी...

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी...

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी...

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी...

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी...

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी...

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी...

कवी - सुरेश भट...

Tuesday 15 May 2012

"स्वातंत्र्यदेवीची विनवणी' 1997 साली भारतीय स्वातंत्र्याच्या पन्नाशीनिमित्त कुसुमाग्रजांनी लिहिली कविता..... स्वातंत्र्योत्तर काळात जनतेने कसे वागावे तसेच व्यावहारिक आणि सामाजिक आशयाशी संलग्न असलेली.... कालच सांगितलेल्या आजच्या स्थितीवर चिंतन आणि मनन करायला लावणारी ही कविता....
स्वातंत्र्यदेवीची विनवणी...


 पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥   

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

------- कुसुमाग्रज

Sunday 6 May 2012

***

आठवणी...... असतात स्वछंद फुलांसारख्या...

पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्या मुलींसारख्या...

चित्राचे सौंदर्य वाढविणाऱ्या रंगांसारख्या...

आकाशात स्वैरपणे बाळगणाऱ्या पक्ष्यांसारख्या...

वर्षाकाळात चमकणाऱ्या विजेसारख्या...

रोज उगविणाऱ्या कोवळ्या काळीसारख्या....

आठवणी......... अशाच असतात ना....!!!


 

Tuesday 1 May 2012

सागरावर रूसलेला, मातृभूमीला कायमचा दुरावले जाऊ या वेदनेतून निर्माण झालेले ह्या अप्रतिम काव्यातून वीर महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट करणारे हे तुफानी काव्य.....!

सागरा प्राण तळमळला.....
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले। परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी । मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥१।।
सागरा प्राण तळमळला.....

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती । दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे । की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता । रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥२।।
सागरा प्राण तळमळला.....

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा । वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता । रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता । रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥३।।
सागरा प्राण तळमळला....

या फेनमिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी । मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता । रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता । रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥४।।
सागरा प्राण तळमळला.....