Tuesday 1 May 2012

सागरावर रूसलेला, मातृभूमीला कायमचा दुरावले जाऊ या वेदनेतून निर्माण झालेले ह्या अप्रतिम काव्यातून वीर महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट करणारे हे तुफानी काव्य.....!

सागरा प्राण तळमळला.....
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले। परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी । मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥१।।
सागरा प्राण तळमळला.....

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती । दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे । की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता । रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥२।।
सागरा प्राण तळमळला.....

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा । वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता । रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता । रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥३।।
सागरा प्राण तळमळला....

या फेनमिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी । मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता । रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता । रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥४।।
सागरा प्राण तळमळला.....

No comments:

Post a Comment